नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोलवर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे असे आरोप करण्यात आले आहे. त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानसभेत आज दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ताच्या नाशिक कनेक्शनवर जोरदार चर्चा झाली. पॅरोलवर सुटलेल्या सलीम कुत्ता याच्या एका पार्टीचा फोटा दाखवत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ निर्माण करुन दिली. या पार्टीत ठाकरे गटाचा एक मोठा नेता यात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्याची चौकशी करण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे नाव विधानसभेत यावेळी आ. राणे यांनी घेतले. त्यांचा पार्टीचा फोटो दाखवून त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ असल्याचेही यावेळी सांगितले. यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुध्दा हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली. या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली.
नाशिकरांनो व्हा सावधान – प्रदीप पेशकार, (प्रदेश प्रवक्ता, भाजपा)
आज विधानसभेमध्ये माननीय आमदार नितेश राणे आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अतिशय गंभीर बाब नाशिकच्या एका तथाकथित हिंदुत्ववादी राजकीय पक्षाच्या संशयास्पद नेत्याबद्दल उघडकीस आणली. मुंबई येथील बॅाम्ब स्फोटाचा मुख्य आरोपी दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोल वर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे हे या महाशयाने केले आहे. आजपर्यंत नाशिककर या अतिरेक्यांच्या एजंटांना पोसत होते काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज जे उघडकीस आले आहे ते अत्यंत भयावह असे चित्र एका हिंदुत्ववादी पक्षाचे सोंग घेतलेल्या व सलीम कुत्ताच्या साथीदाराच्या मुसक्या वेळेवरच आवळायला हव्यात. नाशिककरांना पर्यायाने महाराष्ट्रालाच यापासून वाचवायला हवं. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आपले आभार की आपण यामध्ये एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले, त्याचप्रमाणे नितेश राणे आणि पालकमंत्री दादासाहेब भुसेयांचेही आभार यांनी ही बाब निदर्शनास आणून पुढील होणारा अनर्थ टाळला आहे.