इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुका काही महिन्यात येऊन ठेपलेल्या असतांना आता विविध सर्व्हे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यामुळे अनेक समीकरण बदलली आहे. हिंदी पट्टयात भाजपचे वर्चस्व आहे. तर दक्षिणमध्ये विरोधी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होईल हे आज सांगता येत नसले तरी सर्व्हमधून मात्र काहीसा अंदाज घेतला जात आहे.
टाईम्स नाऊ ईटीजी सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ३२३ जागा जिंकू शकेल, असा अंदाज आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप एकटा ३०८ ते ३२८ जागा जिंकू शकतो, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. तथापि, २०१९ च्या तुलनेत ‘एनडीए’च्या जागांमध्ये काही घट झाल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. सर्वेक्षणानुसार २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष केवळ ५२ ते ७२ जागांवरच थांबू शकतो. याशिवाय भारतातील आघाडीचे पक्ष मिळून १६३ जागा जिंकू शकतात. जवळपास १८ पक्षांनी मिळून भाजपविरोधात विरोधी आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे, संयुक्त जनता दल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक बड्या पक्षांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४३६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी पक्षाला ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर ४२१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या. तेव्हा एनडीएने ३५० जागांचा टप्पा ओलांडला होता आणि भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले होते.
अलीकडेच भाजपने मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी १६३, राजस्थानमधील १९९ जागांपैकी ११५ आणि छत्तीसगडमध्ये ९० पैकी ५४ जागा जिंकल्या आहेत. ईशान्येकडील राज्य मिझोराममध्येही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा आलेख वाढला आणि पक्षाला २ जागा मिळाल्या. दक्षिण भारतीय राज्य तेलंगणामध्येही भाजपने ८ जागा जिंकल्या आहेत.
या सर्व्हेमधून तूर्त तरी भाजपला यश मिळतांना दिसत आहे. पण, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोण कोणता पक्ष कसे उमेदवार देतो. त्यात आघाडी कशी होते. यासारख्या ब-याचा गोष्टी जेव्हा स्पष्ट झाल्यावर यातील अंदाजात काही बदल होण्याची शक्यता आहे. पण, आजतरी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले वातावरण आहे.