नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खो-खो फेडरेशन च्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेला आजच्या तीसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने पॉंडीचरी संघावर १८ विरुद्ध ६ अश्या १ डाव आणि १२ गुण अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे महाराष्ट्राच्या संघाने आपल्या “ब” गटात पहिला क्रमांक मिळवत बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. या सामन्यात महाराषट्राकडून संरक्षणामध्ये खेळाडूंनी चांगली चमक दाखवून पहिल्या डावात केवळ तीन गडी गमावले तर आपल्या धारधार आक्रमणामध्ये पॉण्डिचारीच्या १८ खेळाडूंना बाद केले. तर दुसऱ्या डावातील संरक्षणामध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुन्हा अगदी संयमाने खेळ करून केवळ तीन गडी गमावले. यामध्ये अजय कश्यप, चेतन बिवा, गणेश बोरकर, विराज गळतणे, रमेश वसावे यांचा मोलाचा वाटा होता.
इतर सामन्यात मुलांमध्ये दिल्ली, केरळ, ओडिसा, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक आणि गुजराथ यांनी आपल्या गटात सर्व सामने जिंकून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश केला तर मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, आणि उत्तर प्रदेश संघानी आपल्या गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरी गाठली. मुलींच्या गटात महाराष्ट्राबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ कर्नाटक आणि गुजराथ या संघानी आपल्या गटात पहिला क्रमांक मिळवून बाद फेरी गाठली तर राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू या संघानी आपल्या गटात दुसरा क्रमांक मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या २८ संघांची आठ गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. २८ संघामध्ये खेळल्या गेलेल्या मुलांच्या ३६ साखळी सामन्यात आणि मुलींचे ३६ साखळी सामन्यांतील निकालानुसार या २८ संघांमधून प्रत्येक गटातून पहिले दोन संघ अश्या १६ संघांना बाद फेरीत म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे.उद्यापासून या बाद फेरीच्या सामन्यांना सुरवात होणार आहे अशी माहिती या स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख प्रेमचंद चौधरी यांनी दिली.
या स्पर्धेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षक यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेछया दिल्या यामध्ये इचलकरंजी येथील जैन क्रीडा संस्थेचे संचालक अनिल गांजवे, खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू आणि संघटक साधना देशमुख यायांचा समावेश होता. या स्पर्धा खो-खो साठी असलेल्या अधितकृ मॅटच्या चार मैदानावर खेळविल्या जात आहेत. मैदान व्यवस्था चोख राखण्यासाठी खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गर्दर्शनाखाली सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच व्यवस्थित पार पंडत आहेत.
या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.