इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संसदेची सुरक्षा भेदणा-या घटनेत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला अगोदर पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता फरार सहावा आरोपी ललित झा सापडला आहे. त्याने स्वत:च दिल्लीच्या एका पोलिस ठाण्यात सरेंडर केले. ललित झा महेश नाम व्यक्तीबरोबर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नंतर स्पेशल सेलच्या ताब्यात दिले. घटना घडल्यानंतर तो दिल्लीतून बस पकडून राजस्थानमधील नागौर येथे पळून गेला होता. याठिकाणी तो रात्रभर हॅाटेलमध्ये राहिला. या दरम्यान पोलिस त्याचा शोध घेत असतांना तो आज हजर झाला. या घटनेत ललित बाहेरून व्हिडीओ बनवत होता. गोंधळ होताच त्याने सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढला होता.
ललित झा चे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या निमराना येथे त्याचे लोकेशन सापडले होते. त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. दोन विशेष पथके आरोपी ललित झाच्या शोधात असतांना तो हजर झाला. संसदेतील घुसखोरी प्रकरणी याअगोदर पाच जणांना अटक करण्यात आली. त्तात सागर शर्मा (२६), मनोरंजन डी (३४), अमोल शिंदे (२५), नीलम आझाद (४२) आणि विशाल शर्मा यांचा समावेश आहे. त्यानंतर आता सहावा आरोपी सुध्दा सापडला.
असा ठरला होता प्लॅन
आरोपी मनोरंजनने मार्चमध्येच संसद भवनाची संपूर्ण रेकी केली होती. रेकी करताना मनोरंजनला बुटाची कुठेच नीट तपासणी होत नसल्याचे आढळले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी या सर्व लोकांची म्हैसूरमध्ये भेट झाली होती. ९ महिन्यांनी सगळे पुन्हा एकदा भेटले आणि मग प्लॅन ठरला. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान, आरोपी मनोरंजन बंगळूरहून दिल्लीला आला होता आणि पाससह संसद भवनाची संपूर्ण रेकी केली होती. त्याचवेळी, जुलैमध्ये सागर लखनऊहून आला होता; पण संसद भवनात जाऊ शकला नाही. त्याने बाहेरून संसद भवनाची रेकी केली.
असे पोहचले दिल्लीत
१० डिसेंबर रोजी प्रत्येकजण आपापल्या राज्यातून एक एक करून दिल्लीला पोहोचला होता. मनोरंजन डी विमानाने दिल्लीला आला. सर्व आरोपी १० तारखेच्या रात्री गुरुग्राममध्ये विकीच्या घरी पोहोचले. ललित झा रात्री उशिरा गुरुग्रामला पोहोचला. अमोलने महाराष्ट्रातून रंगीत कुपी आणल्या होत्या. १३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी महादेव रोडवरून खासदारांच्या स्वीय सहाय्यकाकडून पास घेतले.
असा केला प्लॅन ऑक्टीव
प्रत्येकजण इंडिया गेटवर भेटला. तिथे रंगीत धुराची नळकांडी वाटण्यात आली. दोन्ही आरोपी १२ वाजता संसद भवनात दाखल झाले. ललित बाहेरून व्हिडीओ बनवत होता. गोंधळ होताच त्याने सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढला. सर्व आरोपी भगत सिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणात आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे.