जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील माता मृत्यू दरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ४१ माता मुत्यू झाल्या होत्या. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यात ११ माता मुत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाबरोबरच दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांची कामाप्रती निष्ठा व समर्पण वृत्ती यामुळे मातांची प्रसुती वेळेवर व सुरळीत करणे शक्य झाले. याकारणाने माता मुत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.
प्रसूतीच्या दरम्यान ओढवणारे मातांचे मृत्यू ही माता मुत्यू मागील सर्वात जास्त कारण आहे. जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षी २९ माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात २१ व महानगरपालिका हद्दीत ९ माता मुत्यूचा समावेश होता. २०२१-२२ या वर्षी ४० माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात १६ व महानगरपालिका हद्दीत २४ माता मुत्यूचा समावेश होता. २०२२-२३ या वर्षी ४१ माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात ८ व महानगरपालिका हद्दीत ३३ माता मुत्यूचा समावेश होता. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत ११ माता मूत्यु झाले आहेत. यात ग्रामीण भागात ५ व मनपा हद्दीत ६ माता मुत्यूचा समावेश आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका पावसाळ्याच्या दिवसांत तापीला पूर आलेला असतांनाही जीवाची पर्वा न करता प्रसूतीसाठी नदी ओलांडून गाव-पाड्या वस्त्यांवर पोहचतात. यामुळे मातांची प्रसूती वेळेवर होते. यातून महिलांचा मृत्यू ही ओढावत नाही. अमळनेर तालुक्यातील सात्री येथे पुराचा वेढा असतांनाही पोलीस पाटलांच्या मदतीने वैद्यकीय पथकाने जीवाची पर्वा न करता बाळ व बाळंतिणीचा जीव वाचविण्याची घटना मागील काही महिन्यांपूर्वीच घडली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.विवेकानंद बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांच्या पथकाने सातपुड्याच्या जामन्या – गाडऱ्या सारख्या असंख्य दुर्गम पाड्यांवर भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला आहे.
मातामृत्यु कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या. यामध्ये जिल्ह्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर गुरुवारी गरोदर माता तपासणीसाठी एक दिवस ठरविला. त्यामध्ये अतिजोखमीच्या मातेची तपासणी, उपचार व संदर्भसेवा दिली जाते. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियान घेवून त्यामध्ये दुस-या व तिस-या तिमाही तील गरोदर मातांची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून करण्यात येवून अतिजोखमीच्या मातांना आवश्यकतेनुसार उपचार व सल्ला देण्यात आला.
मानव विकास कार्यक्रम जिल्ह्यात ७ तालुक्यामध्ये (अमळनेर, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर) राबविण्यात येतो, यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महिन्यात २ शिबीर घेवून बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गरोदर माता व बालकांची तपासणी करण्यात येते. यामध्ये गरोदर मातेला प्रसुती आधी २ हजार रूपये व प्रसुती नंतर २ हजार रुपये अशी एकूण ४ हजार बुडीत मजुरी दिली जाते. अतिदुर्गम भागात भेटी देवून कार्यक्रमाचे संनियत्रण, मुल्यमापन करून मार्गदर्शन केले जाते. अति जोखमीच्या मातांची यादी करुन त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो.
तीव्र रक्तक्षय असणा-या मातांना इंजेक्शन आर्यन सुक्रोज देवून आरोग्य सेविका व आशा मार्फत पाठपुरावा करण्यात येतो. स्थलातंरीत शेतमजुर, उसतोड कामगार, वीटभट्टी कामगार व बांधकामांवर असलेले मजूर यांचे आशा व आरोग्य कर्मचा-यांमार्फत वेळोवेळी सर्व्हेक्षण करण्यात येते. या उपाययोजनांचे फलित म्हणून माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.
“जिल्ह्यातील आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.”अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.