नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली असून हा संप संस्थगित केल्याचे म्हटले आहे.
या संपाबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिल्यानंतर राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप मागे घेतला आहे. याबाबत संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली असून हा संस्थगित केल्याचे म्हटले आहे.
अहवाल प्राप्त सविस्तर चर्चा
जुनी पेन्शन योजना लागु करण्या संदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.