नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेतल्या घुसखोरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यामुळे लोकसभेत विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेतही कालच्या प्रकारावरुन विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक-ओ-ब्रायन यांना संसदेच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यात आज लोकसभेच्या १४ खासदारांचे निलंबन करण्यात आल्यामुळे निलंबित खासदारांची संख्या १५ झाली आहे.
सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या पाच खासदारांसोबत द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि जनता दलाच्या खासदारांचा समावेश आहे. निलंबित केलेल्या या १४ खारदारांना आता या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळात सहभाग घेता येणार आहे.
खासदार गोंधळ घालत असतांना सभापतींनी वारंवार सूचना देऊनही गदारोळ सुरूच ठेवले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. संसदेची सुरक्षा ही लोकसभा सभापतींच्या अखत्यारीत येते आणि कालच सभापती ओम बिरला यांनी झालेल्या घुसखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गृह सचिवांना लिहिले आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.