शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बॉलिवूड किंग शाहरुख खान याने शिर्डी साई दरबारी हजेरी लावत माथा टेकला. आगामी डंकी या चित्रपटाचे पोस्टर साईचरणी अर्पण करीत या चित्रपचटाला लोकाश्रय मिळू दे, असे साकडे त्याने साईचरणी घातले.
शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानी होती. शाहरूख शिर्डीला येणार असल्याची वार्ता कानोकानी सर्वत्र पसरल्याने त्याला आखो का देखा पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांच्या गराडयातून कसरत करत सुरक्षा रक्षकांनी त्याला कसेतरी मंदिरात नेले. शाहरुख खानने साई समाधीवर निळी शॉल अर्पण केली.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी शाहरूखला साईबाबांची शाल, साईचरित्र ग्रंथ तसेच साई मूर्ती देऊन सत्कार केला. पठाण पूर्वीही त्याने साईबाबांचे आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.
शुक्रवारी प्रदर्शित होत आहे डंकी
शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट येत्या पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याने वैष्णोदेवी आणि साईबाबांचे दर्शन घेतले. डंकी चित्रपटात शाहरुखसोबत विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शहा आदी कलाकार दिसणार आहेत. राजकुमार हिराणी यांनी तो दिग्दर्शित केला आहे.