पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी ) कौशल्य विकास विभागाच्या सौजन्याने टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्यातर्फे ५०० युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अनिवासी मोफत प्रशिक्षणासाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे व मुंबई या शहरांची निवड करण्यात आली असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन बार्टीमार्फत करण्यात आले आहे.
बार्टी आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत पुणे व पुणे (नऱ्हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बार्टीच्या कौशल्य विकास विभागाअंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी आहे.
प्रशिक्षणात बिझनेस डेव्हलपमेंट एक्झ्युकेटीव्ह, ऑटो सेल कन्सल्टंट, कस्टमर केयर एज्युकेटीव्ह, साइबर सिक्योरिटी, फ्रंट ऑफिस असोसिएट, रिटेल सेल असोसिएट, असिस्टेंट इलेक्ट्रीशियन, महिलांसाठी असिस्टेंट ब्यूटी थेरेपिस्ट, जनरल ड्यूटी असिस्टेंट, क्विक सर्विस रेस्टोरेंट एज्युकेटीव्ह, ऑटोमोटीव्ह सर्विस टेक्निशियन (टू-व्हिलर), ऑटोमोटिव सर्विस टेक्नीशियन (४ व्हीलर), फूड ॲण्ड बेवरेज सर्विस-स्टीवर्ड, हाउसकीपिंग ऑपरेशन, फील्ड टेक्निशियन (एसी), आटोमोटीव्ह टेली-कॉलर, यूएक्स डिजाइनर, फील्ड ऑफिसर ॲग्री, सोलर पीवी इन्ट्रालर, एसी ॲण्ड आर ऑपरेटर (सेंट्रल एसी) इत्यादी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.
प्रशिक्षणार्थींना इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्व विकास व उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार असून मोफत प्रशिक्षण साहित्य पुरविण्यात येणार आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर १०० टक्के नोकरीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत ८५ टक्के उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी बार्टीकडून विद्यावेतनाची तरतूद करण्यात आलेली आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह https://rb.gy/kra7b या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, (मार्कशिट), शाळा, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईट छायाचित्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार हा १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.
प्रशिक्षण व इतर माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील बार्टीच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठीचे नागपूर ९०२१२०४४९९, पुणे ९९२०९३४०९६, नाशिक ८६९८४११२८८, पुणे (नऱ्हे) ७७७००४५४५४, मुंबई ७५६६६११०९३, तळोजा ९९२०९८९४५०, ठाणे ९९२०१९१६४८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनां व कौशल्य उपक्रमांची माहिती बार्टीच्या www.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर दिली असून जास्तीत जास्त युवक युवतींनी संकेतस्थळावर भेट देवून योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.