इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः आरोपी मनोरंजनने मार्चमध्येच संसद भवनाची संपूर्ण रेसे केली होती, असे सांगण्यात येत आहे. रेकी करताना मनोरंजनला बुटाची कुठेच नीट तपासणी होत नसल्याचे आढळले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी या सर्व लोकांची म्हैसूरमध्ये भेट झाली होती. ९ महिन्यांनी सगळे पुन्हा एकदा भेटले आणि मगच प्लॅन ठरला. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान, आरोपी मनोरंजन बंगळूरहून दिल्लीला आला होता आणि पाससह संसद भवनाची संपूर्ण रेकी केली होती. त्याचवेळी, जुलैमध्ये सागर लखनऊहून आला होता; पण संसद भवनात जाऊ शकला नाही. त्याने बाहेरून संसद भवनाची रेकी केली.
असे पोहचले दिल्लीत
१० डिसेंबर रोजी प्रत्येकजण आपापल्या राज्यातून एक एक करून दिल्लीला पोहोचला होता. मनोरंजन डी विमानाने दिल्लीला आला. सर्व आरोपी १० तारखेच्या रात्री गुरुग्राममध्ये विकीच्या घरी पोहोचले. ललित झा रात्री उशिरा गुरुग्रामला पोहोचला. अमोलने महाराष्ट्रातून रंगीत कुपी आणल्या होत्या. १३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी महादेव रोडवरून खासदारांच्या स्वीय सहाय्यकाकडून पास घेतले.
असा केला प्लॅन ऑक्टीव
प्रत्येकजण इंडिया गेटवर भेटला. तिथे रंगीत धुराची नळकांडी वाटण्यात आली. दोन्ही आरोपी १२ वाजता संसद भवनात दाखल झाले. ललित बाहेरून व्हिडीओ बनवत होता. गोंधळ होताच त्याने सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढला.सर्व आरोपी भगत सिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणात आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
हे आठ कर्मचारी झाले निलंबित
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याचे समजते. बुधवारी दुपारी एक वाजता सभागृहाच्या कामकाजादरम्यान दोन घुसखोर लोकसभेत घुसले. त्यांना नंतर अटक करण्यात आली. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत. संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी एक अद्याप फरार आहे.
यांना झाली अटक
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या निमराना येथे त्याचे लोकेशन सापडले. त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. सध्या दोन विशेष पथके आरोपी ललित झाच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांत सागर शर्मा (२६), मनोरंजन डी (३४), अमोल शिंदे (२५), नीलम आझाद (४२) आणि विशाल शर्मा यांचा समावेश आहे.
चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक अनिश दयाल सिंग या समितीचे नेतृत्व करत आहेत. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये इतर सुरक्षा एजन्सींचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटीचे कारण शोधून कारवाईची शिफारस करणे हे समितीचे काम आहे.