नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिओ कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी करीत भामट्यांनी एका ६६ वर्षीय वृध्देच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. मोबाईलवर एक अॅप्लीकेशन इस्टॉल करण्यास भाग पाडून सायबर भामट्यांनी तब्बल ५ लाख ३५ हजार ७०० रूपयांची रोकड ऑनलाईन लांबविली असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहिनी शामलाल नरियाणी (रा.गायके कॉलनी,धोंगडे नगर ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नरियाणी यांच्याशी गेल्या १८ नोव्हेंबर रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता. जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी त्यांना एका अॅप्लीकेशनची लिंक पाठविली. व्हाटसअप द्वारे पाठविण्यात आलेली लिंक इन्स्टॉल करण्यास भाग पाडून भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील रोकडवर डल्ला मारला. पैसे अन्य खात्यात वर्ग झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याने नरियाणी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
दहशत माजविणा-या तरूणावर पोलिसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धारदार चाकूचा धाक दाखवून दहशत माजविणा-या तरूणावर पोलिसांनी कारवाई केली. वडाळागावातील गरिबनवाज कॉलनी भागात ही कारवाई करण्यात आली असून संशयिताच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नावेद सत्तार शहा (रा.गंजमाळ झोपडपट्टी) असे संशयित चाकूधारीचे नाव आहे. याबाबत अंमलदार सौरभ माळी यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.१२) रात्री गरिबनवाज कॉलनी भागात एक तरूण चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात चाकू आढळून आला. अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.
……..