नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिन्नर फाटा भागातील रेल्वे ब्रिज भागात भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गुलाम मुस्तफा (रा.सादिकनगर,वडाळागाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारगुलाम मुस्तफा हे मंगळवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास सिन्नर फाट्याकडून नाशिककडे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. रेल्वे लाईन वरिल उड्डाणपूलावरून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ इबी १२६८ या छोटा हत्ती टेम्पोने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत हवालदार ठेपणे यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जुने नाशिक परिसरातील नागझिरा शाळा भागात करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्की नरेश शिंदे (२३ रा.नागझिरा शाळेजवळ भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शिंदे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर आणि जिह्यातून २१ महिन्यासाठी त्यास हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.१३) तो आपल्या घरी आलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या असून याबाबत पोलिस नाईक अविनाश जुंद्रे यांनी दिलेल्या फिर्यावरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार साळुंखे करीत आहेत.