नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पखालरोडवरील मायरोन स्कूल भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. आकाश प्रकाश इंगळे (रा. रोकडोबावाडी देवळाली गाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इंगळे बुधवारी (दि.१३) पखालरोडवरील सागर टॉवर येथील बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगवर काम करीत असतांना ही घटना घडली. सहाव्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यास मुंबई नाका परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. महेश राजेंद्र यांनी मृत घोषीत केले. याबाबत डॉ. रोशन चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गोडे करीत आहेत.
दोन दिवसापूर्वीच सहाव्या मजल्यावरुन पडल्याने मजूर महिलेचा मृत्यु झाल्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. सुवाली राकेश चौहान (वय १८, गढवाल, बडवानी मध्यप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. पाथर्डी शिवारात गजरा नंदनवन बांधकाम साईटचे काम सुरु आहे. येथे सहाव्या मजल्यावर रेती वाहून नेतांना तोल गेल्याने युवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.