इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याचे समजते.
बुधवारी दुपारी एक वाजता सभागृहाच्या कामकाजादरम्यान दोन घुसखोर लोकसभेत घुसले. त्यांना नंतर अटक करण्यात आली. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत. संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी एक अद्याप फरार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या निमराना येथे त्याचे लोकेशन सापडले. त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. सध्या दोन विशेष पथके आरोपी ललित झाच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांत सागर शर्मा (२६), मनोरंजन डी (३४), अमोल शिंदे (२५), नीलम आझाद (४२) आणि विशाल शर्मा यांचा समावेश आहे.