नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पीएचडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. युवकांनी त्यांचा निषेध केला. आंदोलने झाली. वक्तव्य अंगलट येणार असल्याचे दिसताच अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा नेहमीचा सूर आळवला.
पीएचडीबाबत माझा तोंडातून काय दिवा लावला जाणार असा शब्द गेला. त्याचा गाजावाजा करण्यात आला, असे सांगत पवार यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली, असे सांगून ते म्हणाले, की अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्याबाबत दुमत नाही; परंतु विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पेन्शनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्या रात्री दहा वाजता ही भेट होणार आहे. कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत पवार हे शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.