नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथील रेल्वेतील लोको पायलट मनोज जगताप यांचा मुलगा शुभम जगताप यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्याचा दिक्षांत सोहळा देहरादून येथे संपन्न झाला. या सोहळ्यात वडील मनोज जगताप व शिक्षिका असलेल्या आई वर्षा जगताप व भाऊ शिवम जगताप हे गेले होते. त्यांनी हा सोहळा बघितल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शुभमचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मनमाड येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानतंर त्याने सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कुलमध्ये घेतले. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पदवीधर शिक्षणसाठी पुणे येथे गेला. त्यानंतर शुभमने फर्ग्यूसन व एचव्ही देसाई महाविद्यालयातून बी.एससीचे शिक्षण भौतिकशास्त्र विषय घेऊन केले. पदवी मिळाल्यानंतर त्याने इन्फोसिसमध्ये १ वर्षे नोकरी केली.
हा सर्व प्रवास सुरु असतांना शुभमने सीडीएस परीक्षा दिली. कम्बाइन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन. ज्या उमेदवारांना भारतीय सेनेमध्ये जायचे असते त्यांच्यासाठी ही परिक्षा असते. ही परिक्षा पास झाल्यानतंर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डने घेतलेल्या मुलाखतीत तो पास झाला. यानंतर तो ऑफीसर या पदासाठी भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर देहरादून इंडियन मिलीटरी अॅकेडमी येथे १८ महिन्याचे ट्रेनिंग झाल्यानतंर त्याची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली.
भारत मातेची सेवा घडो…
शुभमला सातारा सैनिकी स्कुलमध्ये शिकायला घातलं होत त्यादिवशी बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना बघून छाती अभिमानाने ५६ इंचांची झाली…आज इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील जवळपास १८ महिन्यांचं खडतर असं प्रशिक्षण पूर्ण करून भारत मातेच्या रक्षणार्थ त्याचं पहिलं पाऊल टाकताना बघून मनस्वी आनंद होत आहे. त्याच्याकडून भारत मातेची सेवा घडो हीच आदिशक्तीचरणी प्रार्थना…
मनोज जगताप (वडील) वर्षा जगताप (आई)