मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेबाहेर स्मोक बॅाम्ब फोडणा-या लातूरच्या अमोल शिंदेला महाराष्ट्रातील ख्यातनाम वकील असीम सरोदे हे कायदेशीर मदत करणार करणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. या पोस्टनंतर राज्यातील अनेक जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.
या पोस्टमध्ये अॅड. सरोदे यांनी म्हटले आहे की, अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार. अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.
त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?