ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने धडक कारवाई करून, पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती देणाऱ्या गौरव पाटील या तरुणाला अटक केली आहे. ठाणे येथे अटक केलेला गौरव पाटील हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याचा असून तो ठाणे येथे राहत होता. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले असून पुढे नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने ६ महिन्यांची अप्रेंटिसशिप केली होती. येथूनच त्याने महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे. तो ठाणे परिसरात एकटाच राहत असल्याचेही समोर आले आहे.
गौरव पाटील पाकिस्तानी गुप्तहेराशी व्हॉटस्ॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होता. ही माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला ऑनलाईन पैसे मिळत होते. दहशतवादी पथकाने अटक केलेल्या गौरव पाटील याला न्यायालयाने १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पाटील याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा संशय आहे. पाकिस्तानचा गुप्तहेर पाटीलसह अन्य तीन जणांच्या संपर्कात होता.
दहशतवाद विरोधी पथकाला गौरव हा प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेराला पुरवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने या पथकाने कारवाई केली. दहशतवाद विरोधी पथकाने संशयिताची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर गेल्या सात महिन्यात त्याने पाकिस्तानी गुप्तहेराला सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचे चौकशीत उघड झाले. गौरव पाटील याच्याशिवाय अन्य तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
गौरव पाटील हा तरुण एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पाकिस्तानातील हेर संस्थेच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या काही ठिकाणांबाबतची संवेदनशील माहिती तो व्हॉट्सअप आणि फेसबुक या संदेश मंचांच्या माध्यमातून पाकिस्तानी हेर संस्थेला कळवत होता. त्या बदल्यात त्याला ऑनलाइन पैसे मिळत असत. याबाबतची खबर मिळाल्यानंतर एटीएसच्या मुंबई युनिटने त्याच्या मुसक्या आवळल्या. या हेरगिरी कारस्थानात अन्य तीन जणही गुंतलेले असून, ते गौरव पाटील याच्या संपर्कात होते. त्यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर
या माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. पाटीलला अटक करण्यात आली आहे.