नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३-२४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातर्फे, सलग तीन अर्धशतक झळकावत जोरदार कामगिरी करत असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या युवा साहिल पारखला भारतीय खाद्य निगम (एफसीआय – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) तर्फे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत क्रिकेट खेळाडू साठीचे खास वेतन – स्टाय पेंड – जाहीर झाला आहे. भारतीय खाद्य निगमच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने तसे साहिल पारखला अधिकृत पत्र पाठवून कळवले आहे.
साहिल पारख डावखुरा सलामीवीर असून त्याची याआधी १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती. १७ एप्रिल ते ११ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख, कुमार खेळाडूंसाठी हे शिबीर झाले होते. साहिलची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती. बीसीसीआयची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा ३ ते ९ नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी येथे खेळवण्यात आली. त्यात साहिलने इंडिया डी संघाचे प्रतिनिधित्व केले.
२०२३ – २४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धा, १७ नोव्हेंबेर ते १२ जानेवारी दरम्यान भारतभर विविध ठिकाणी होत आहेत. महाराष्ट्र संघाचा पाचवा साखळी सामना १५ डिसेंबरपासून रोजी औरंगाबाद येथे बरोडा संघाबरोबर होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी साहिलचे खास अभिनंदन करून शाबासकी दिली व उर्वरित स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.