नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाचे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १० लाख ११ हजार २७२ रुपयाचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त केला आहे. बुधवारी पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून १० लाखाच्या आसपास माल जप्त केला आहे. तर मंगळवारी सातपुर य़ेथे टाकलेल्या छाप्या ११ हजार २७२ रुपये किंमतीचा प्रतिबंधीत साठा जप्त केला आहे.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी बाळकृष्ण निवास, बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कुलसमोर, पेठरोड, नाशिक या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणुक केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर छापा टाकण्यात आला. या ठिकाण कुलूप आढळून आले. आजुबाजूला चौकशी केली असता, जागामालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले. त्यांचा जबाब नोंदविला असता सदरचे गोदाम हे दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाडयाने दिल्याचे सांगितले. परंतू त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला व आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्याने सदर गोदामात खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती साठविल्याचे आढळून आली.
पंचवटी पोलिस स्टेशन यांना बंदोबस्त मागितला असता पोलिसांच्या उपस्थितीत व पंचाच्या समक्ष सदरचे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कुलूप तोडून उघडून प्रवेश केला असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्याचे मोजमाप केले असता आतापर्यन्त अंदाजे १० लाखाच्या वर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्यासंदर्भात अधिका-यांनी ताब्यात घेतला असून मोजमाप अदयाप सुरु असून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींविरुध्द कारवाई सुरु आहे.
मंगळवारी पवन संजय कोतकर, एमएचबी कॉलनी, सातपुर, नाशिक येथे धाड टाकली. सदर ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा ११ हजार २७२ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. पाटील यांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी कोतकर यांचेविरुध्द सातपुर पोलिस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपुर पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म. मो. सानप व विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.उ.रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यो.रो.देशमुख, गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.