नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठत व महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्यावतीने गोरेवाडा येथे चालविण्यात येत असलेल्या वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्यपाल रमेश बैस यांनी आज भेट दिली. राज्यापालांनी या भेटीत वाघ व बिबट युनिट तसेच प्रयोगशाळा व दवाखान्याची पाहणी केली.
राज्यपाल कार्यालयाच्या प्रधान सचिव श्वेता सिंघल, उपसचिव राजेंद्र धूरजड, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने कुलगुरू डॉ. नितीन पाटील, माफसूचे अधिष्ठाता डॉ. शिरिष उपाध्ये, कुलसचिव डॉ. नितीन कुरकुरे, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजय गावंडे, उपसंचालक डॉ. भाग्यश्री भदाणे, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस.एस. भागवत, सहाय्यक व्यवस्थापक सारिका खोत, सहाय्यक व्यवस्थापक कुलदिप शिंदे, विषयतज्ञ मयूर पावसे, सुमित कोलंगथ व शालिनी ए.एस. यावेळी उपस्थित होते.
मानव वन्यजीव संघर्षात सापडलेले वन्यजीव, अनाथ व जखमी पशू यांच्यावर उपचार करून त्यांच्या पुनर्वसन या केंद्रामार्फत करण्यात येते. अशा प्रकारचे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. या केंद्रात ३२ बिबट व २४ वाघ आहेत, तर विविध प्रकारचे अनेक प्राणी व पशू यांचेवर या ठिकाणी उपचार केल्या जात आहेत.
वन्यजीवचा बचाव करणे, त्यांच्यावर उपाचार करणे, उपचारापश्चात पुनवर्सन, वनजीवांमध्ये आढणाऱ्या विविध आजारासंबंधी संशोधन करण्यासोबतच वन्यजीवाबद्दल जनमाणसात सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून या केंद्रामार्फत जनजागृती केल्या जाते. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षणाच्या कार्याची राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशंसा केली. वन्यजीवाबद्दल असलेल्या केंद्राच्या बांधिलकी बद्दल राज्यपालांनी संपूर्ण चमूने कौतुक केले.