नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व ३१ रक्तपेढयांमध्ये ॲलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र) येत्या महिन्याभरात बसवण्यात येईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय खासगी रक्तपेढ्यांनाही असे ॲलिकॉट मशीन बसविण्याची सक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सभागृहात आज सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नसल्यामुळे रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढ्यांपैकी सध्या केवळ ८ रक्तपेढ्यांध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी केवळ ३ ठिकाणी ॲलिकॉट मशीन ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र महिनाभरात हे मशीन बसविण्यात येईल, असे त्यांनी संगितले.
ॲलिकॉट मशीनचे तंत्रज्ञान हे नवीन नाही. ॲलिकॉट मशीन हे लहान यंत्र असून रक्ताची ३५० मि.ली.ची पूर्ण बॅग गरजेप्रमाणे विभाजन करुन बाल रुग्णांना अचूक तेवढेच रक्त देण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या कार्यरत असलेले रक्त केंद्र तंत्रज्ञ ही मशीन वापरु शकतात, अशी माहितीही यावेळी प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.
पदभरती प्रक्रिया लवकरच पूर्ण
सार्वजनिक आरोग्य विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीची पदभरती प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली. यावेळी सदस्य भास्कर जाधव, योगेश कदम, प्रणिती शिंदे, अनिल देशमुख, देवयानी फरांदे, प्रकाश आबिटकर, सुलभा खोडके, राजन साळवी, मनीषा चौधरी आणि रत्नाकर गुट्टे यांनी उपप्रश्न विचारले.
पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी
नागपूर – राज्यात सन २०१४ पासून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम (पॅरामेडिकल) उत्तीर्ण असलेल्या ज्या विद्यार्थ्यानी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एकही तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात सन २०१४ पासून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला असला तरी त्याची नोंदणी करण्यास सन २०१९ पासून सुरुवात झाली. नोंदणीसाठी २०१४ पासून अर्ज केलेल्या ५४३३ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने अद्याप नोंदणी केली नाही आणि नोंदणी अभावी विद्यार्थी बेरोजगार झाले असल्याच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य राजेश टोपे, शेखर निकम, ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले.