नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या अपघातामध्ये तीघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन पादचा-यांसह रिक्षातून प्रवास करणा-या महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर,नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला अपघात पाथर्डी पंचक मार्गावर झाला. या अपघातात प्रिया भिमराव जाधव (३१ रा.वृंदावन आवेनिक पाथर्डी शिवार) यांचा मृत्यू झाला. प्रिया जाधव या मंगळवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास पंचक येथे रिक्षातून जात असतांना हा अपघात झाला. तुळजा भवानी पेट्रोल पंप परिसरात भरधाव रिक्षा पलटी झाल्याने त्या दबल्या गेल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने संदिप पोरजे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. हेमंत काळे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
दुस-या अपघातात मानस रतन दोंदे (२० रा.दोंदे चौक,अंबडगाव) हा युवक गेल्या १४ ऑक्टोबर रोजी सातपूर औद्योगीक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना अपघात झाला होता. एशिया अॅटोमोटीव्ह कंपनी भागात भरधाव अॅक्टीव्हा मोपेड चालकाने त्याच्या दुचाकीस कट मारल्याने मानस दुचाकीवरून पडला होता. या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत आकाश कुमावत (रा.कामटवाडा,सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास साहेबराव मोरे (रा.विजयनगर,सिडको) या अॅक्टीव्हा चालकाविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
तिसरा अपघात नाशिकरोड येथील सुभाषरोड भागात झाला. किशोर गणपत शिंदे (६५ रा. पगारे चाळ,सुभाषरोड) हे वृध्द गेल्या शनिवारी (दि.९) सुभाषरोडने सत्कार पॉईटच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. रिपोर्ट कॉर्नर भागात भरधाव एमएच एझेड ५०२५ या मोपेड दुचाकीने त्यांना जोरदार ठोस दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. सोमवारी (दि.११) त्यांची प्रकृर्ती खालावल्याने जिल्हारूग्णालयात हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना डॉ. गुंजन मिश्रा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक आशिष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात सदर दुचाकीचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.