नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील नाशिक जिल्ह्यातील वाहनांना देण्यात येणारी टोल सवलत पुन्हा सुरु करण्यात यावी. तसेच पिंपळगाव बसंवत टोल नाक्यावरील प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्टकडून असोसिएशनकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रादेशिक अधिकारी भाऊसाहेब साळुंखे यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसंवत टोल नाक्यावरील मनमानी कारभाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी भाऊसाहेब साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत भाऊसाहेब साळुंखे यांनी दखल घेऊन या प्रकरणात मदत करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले व सदर प्रकरणाचे निवेदन देण्यात आले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयास निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी.एम.सैनी, पदाधिकारी शंकर धनावडे, सादाशिव पवार, उत्तम पवार, शिवनारायन सोमानी, जसबीरसिंग आनंद, रामभाऊ पठारे, महेंद्र सोळुंके, बाळू जाधव, मंगेश जाधव, लक्ष्मण म्हसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत या टोल नाक्यावर शासनाच्या ६० किलोमीटर अंतराची नियमावली डावलून टोल नाका विकसित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या विरोधात आवाज उठविल्यानंतर शासनाच्या वतीने पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ व एमएच ४१ पासिंग असलेल्या वाहनांना टोल दरात सवलत देण्यात आलेली होती. मात्र पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील प्रशासनाकडून ही टोल सवलत अचानकपणे बंद केली असून वाहनधारकांकडून अतिरिक्त टोल रक्कम वसूल करण्यात येत असल्याने वाहनधारकांमध्ये असंतोष पसरलेला असल्याचे म्हटले आहे.
पिंपळगाव टोल नाका विकसित करण्यात आल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नेहमीच वादात राहिलेला आहे.स्थानिक वाहणांची नोंदणी करण्यास सुद्धा तांत्रिक अडचणी सांगून टाळाटाळ केली जाते.आजवर याठिकाणी अनेक वादाच्या घटना घडलेल्या आहे. अगदी लोकप्रतिनिधी पासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वादाच्या घटना घडल्याने हा टोल वादात सापडलेला आहे. शासनाच्या टोल धोरणांनुसार ६० किलोमीटर अंतरावच्या आत दुसरा टोल विकसित करण्यात येत नाही. मात्र तरी देखील पिंपळगाव टोल विकसित करण्यात आला. याठिकाणी जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोल सवलत देण्यात आलेली होती. ती अचानकपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक वाहनांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ व एमएच ४१ पासिंग असलेल्या वाहनांना टोल दरात सवलत पूर्ववत करून करण्यात यावी तसेच येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा असे निवेदनात म्हटले आहे.