नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देण्याची शक्यता असल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला.
पवार म्हणाले की त्यांनी राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन पाळता न आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागेल. अर्थात त्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही. राज्यघटनेला जागून न्याय द्यायचा झाला, तर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवावे लागेल. ते असे करणार नाहीत. राजकीय आत्महत्या टाळण्यासाठी ते राजीनामा देऊ शकतात.
नार्वेकर यांचा निकाल पुढे ढकलण्याचा प्रयत्न असेल.त्यासाठी ते राजीनामा देतील. त्यानंतर नवीन अध्यक्ष नेमून त्यांच्याकडे सुनावणी जाईल. कदाचित न्यायालयातून निर्णय घ्यावा लागेल, असे सांगून आ. पवार यांनी त्यांचे चुलते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अजित पवार यांनी पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेले विधान चुकीचे आहे, असे ते म्हणाले. युवकांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. असे सांगून आ. रोहित पवार म्हणाले, की श्रीमंताचा मुलगा पीएचडीसाठी पैसे मागायला सरकारकडे का येईल ? ही शेतकऱ्यांची, गरीबांची मुले आहेत. पीएचडीसाठी वेळ लागतो. मुलांकडे क्षमता आहे; परंतु पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर ही ही मुले सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात गैर नाही.