नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अहमदाबाद येथे आठ ते दहा डिसेंबर दरम्यान आयोजित पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग स्पर्धेत नाशिकच्या तनुजा वाघ हीने ७८ किलो गटात सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकावले तर वैष्णवी खलाने हीने ५२ किलो गटात रौप्य पदक मिळविले. या दोन्ही खेळाडूंची लखनौ उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याचप्रमाणे सहा ते दहा डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित राज्य निवड चाचणीमध्ये नाशिकच्या सार्थक चव्हाण याने ५० किलो गटात प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीच्या आधारे त्याची कोची, केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
तसेच सोनीपत, हरियाणा येथे आयोजित केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये वैष्णवी मोरे हीने कास्य पदकाची कमाई केली आणि निशा शिंदे हीने चांगला खेळ करून आपली छाप पाडली. याचप्रमाणे पुणे विद्यापीठ अंतर्गत सिन्नर येथे पार पडलेल्या विद्यापीठ स्पर्धेत नाशिकची राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू आकांक्षा शिंदे हीने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करून सुवर्ण पदक मिळविले. . तिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
हे सर्व खेळाडू यशवंत व्यायाम शाळा येथे गेल्या अनेक वर्षापासून नियमित सराव करतात. .या सर्व खेळाडूंना साईचे प्रशिक्षक विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल या सर्वांचे ज्युदो सचिव तथा जेष्ठ संघटक रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, राज्य ज्युदो असोसिएशनचे खजिनदार रविंद्र मेतकर, ,राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक माधव भट आणि सुहास मैंद यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.