नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टाकळी फाटा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ३५ वर्षीय कामगार महिलेचा मृत्यू झाला. लिला राजू वायदाणे (रा. गरवारे कंपनी शेजारी साठेनगर अंबड) असे मृत कामगार महिलेचे नाव आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने पुन्हा एकदा बांधकाम साईटवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
लिला वायदाणे या टाकळी फाटा भागात मेट्रो पोलीशन कन्स्ट्रक्शनच्या नव्याने सुरू असलेल्या बहुमजली बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. मंगळवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास त्या सहाव्या मजल्यावर पाणी मारत असतांना अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या या घटनेत गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर ठेकेदार विलास गोरे यांनी त्यांना मुंबई नाका परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले. येथे उपचार सुरू असतांना डॉ. महेश राजेंद्र यांनी महिलेला मृत घोषीत केले. याबाबत डॉ. पल्लवी साळवे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.