नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील दुष्काळी जाहीर झालेल्या मालेगाव तालुक्यातील सात गावांना केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. पावसा अभावी हातातून गेलेल्या कपाशी, मका पिकांची पाहणी केल्यानंतर या पथकाने लेट खरीप लागवड कांद्याची पाहणी केली.
यावेळी पाणी कांद्याला कोठून देताय असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत विहिरी पण पाहिल्या. विहिरीत पाझरणाऱ्या पाण्यावर शेतकरी पाणी साठवत तो कांद्याला पाणी देत असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनात आणून देत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राला देण्यात येणार असून सरकारने जे नाशिक जिल्ह्यात ३ तालुके जाहीर केले. त्या भागात आपण पाहणी करत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाचे सहसचिव प्रियरंजन यांनी सांगितले.
मंगळवारी पुणे खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक झाली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य समिती करेल, असे केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव प्रिय रंजन यांनी सांगितले. हे पथक राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करुन शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे.