इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सहा हजार कोटीचा घोटाळा असलेल्या महादेव गेमिंग अॅप्सचा मालक रवी उप्पल याला दुबईत ताब्यात घेण्यात आले आहे. रवी उप्पलशिवाय अन्य दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. रवी उप्पल यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. भारतीय तपास यंत्रणा दुबई सुरक्षा एजन्सीच्या संपर्कात आहेत.
उप्पल हा महादेव अॅपमधील मुख्य आरोपींपैकी एक आहे. त्याला लवकरच अटक करून हद्दपार करण्यात येईल. आरोपी सौरभ चंद्राकर याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. ते महादेव अॅपचे दुसरे प्रवर्तक आहेत. या दोघांनी महादेव अॅप आणि सट्टेबाजी घोटाळ्यातील सहभाग नाकारला आहे. याची जबाबदारी त्यांनी शुभम सोनी यांच्यावर टाकली. ‘ईडी’ने संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासातून शुभम सोनीचा जबाब घेतला आहे. दुबईत बसलेल्या प्रवर्तकांवर ६० हून अधिक बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप्सद्वारे घोटाळे केल्याचा आरोप आहे. सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.
या प्रकरणी ईडीने सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, विकास छाब्रिया, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, अनिल दममानी, सुनील दममानी, विशाल आहुजा, नीरज आहुजा, सृजन असोसिएट संचालक पूनराम वर्मा आणि शिवकुमार वर्मा यांच्यासह १४ जणांना आरोपी केले आहे.