इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्य़ावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुंड पाठवले. आपल्याला जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे ते म्हणाले.
दिल्लीसाठी तिरुअनंतपूरम विमानतळावर जात असताना, सत्ताधारी सीपीआय(एम) ची विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ च्या काही लोकांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. या घटनेमुळे केरळमध्ये राजकीय गोंधळ वाढला आहे. वाहनाच्या धडकेनंतर लगेचच राज्यपाल आरिफ मोहम्मद आपल्या कारमधून बाहेर आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आपल्याला मरण्यासाठी गुंडांना पाठवल्याचा आरोप केला.
खान म्हणाले, की त्यांना शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री विजयन यांचा यात सहभाग आहे. ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक वैयक्तिक लक्ष्य करून केलेले कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असेल, तर आंदोलकांच्या गाड्यांना तिथे जाण्याची परवानगी असेल का? पोलिस मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ कोणालाही येऊ देतील का? तुम्ही परवानगी देता का? इथे आंदोलकांच्या गाड्या उभ्या होत्या. पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली.
तिरुअनंतपूरमच्या रस्त्यांवर ‘गुंडांनी’ कब्जा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. आपल्या वाहनावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान खूपच संतप्त झाले आहेत. त्यांनी या घटनेचा आणि केरळमधील लोकशाहीच्या ढासळलेल्या स्थितीचा निषेध केला. राजकीय मतभेदामुळे शारीरिक हिंसा होऊ नये यावर त्यांनी भर दिला. आंदोलक विद्यार्थ्यांनी केवळ झेंडेच फडकवले नाहीत, तर त्यांच्या वाहनावर दोन्ही बाजूंनी हल्ला केल्याचा आरोप खान यांनी केला आहे.