नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समिती कार्यान्वीन करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०२६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्याकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील. त्यासाठी नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांकरिता नाशिक महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो. यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही. विकासकामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समिती कार्यान्वीन करून राज्य व केंद्रशासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही
व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.