सुदर्शन सारडा, नाशिक
सोमवारी चांदवड येथे कांदा आंदोलन झाल्यानंतर शरद पवार नाशकात मुक्कामी आले आणि मंगळवारी वाढदिवशी भल्यापहाटे पासून शुभेच्छा स्वीकारत त्यांनी ८४ व्या वर्षात पदार्पण करत साडेनऊ वाजता नागपूरकडे उड्डाण केले. खासगी विमानात त्यांनी उध्दव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार आणि निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांना नागपूरसाठी सोबत येण्याचे सांगत विमानात समोरचा बाक दिला. त्यामुळेच व्हायरल झालेला तो विमानाचा व्हिडिओ आणि सुरू झालेली चर्चा शमवण्याचे नाव घेत नसताना अजित पवार गटाचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी नागपूर लँडिंग नंतर शरद पवारांना पुष्पगुच्छ देत हृदयात पवार साहेब कायम असल्याचा नारा दिला. त्याला पवारांनी कितपत स्वीकारले हे येणारा काळ सांगेल.
हे सगळे घडायचे कारण एकच कांदा निर्यात बंद झाली अन् अख्ख्या नाशिक जिल्ह्याचा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. शेती आणि शरद पवार हे समीकरण गेल्या पाच दशकांपासून जुळलेले असताना सोमवारी कांद्याच्या माहेरी त्यांचे झालेले आंदोलन त्यांच्यातला शेती प्रश्नांबाबत मत्सुद्दीपणा पुन्हा एकदा राजकीय वारू फिरवतो की काय अशी शक्यता डोके वर काढू लागली. त्यातच निफाड तालुक्याचा शेतकरी तितकाच अवकाळी पावसाने हवालदिल झाला.
निफाडची शेती आणि राजकारण हे जितके श्रेष्ठ तितकेच कर्मण्येवाधी आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज तूर्तास नाही. अशातच आधीच्या काळात मोगल-बोरस्ते गट आणि आताचा बनकर-कदम गट ऐन थंडीत वातावरण तापवण्यात माहीर झालेला दिसतो. दिलीप बनकर म्हणजे अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानणारे हे आधीपासून ठरलेले आहे. पण बनकर यांना प्रत्येक वजनदार शब्द निर्माण करण्यात शरद पवार यांची कोचिंग घ्यावी लागली. सध्याच्या राजकीय हलाखीत गट बदल म्हणजे बसबदल करण्यासारखे झाले असताना बनकर यांचे कट्टर विरोधक अनिल कदम यांना शरद पवारांनी विमानात सोबत घेणं म्हणजे दुश्मन का दुश्मन हमेशा दोस्तचा डायलॉग आठवून देणारा आहे.
कदम बनकर शीतयुद्ध निवडणूक पटलावर यायच्या आधीच शरद पवार यांचा कदम जवळीकीचा बाण नेमका लागल्याचे काही तासात प्रत्ययात दिसले. निफाड हा शेती समृद्ध तालुका असताना शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. अशा राजकीय कहाणीत सोशल मीडियावर सुरू असलेले हे हास्य कुणाला दुःख पोहोचवत असेल तर ती हतबलता समजणे वावगे नाही. दोन्ही कडील हेच समीकरण आगामी काळातल्या राजकीय वळणाला काँक्रिट स्वरूप देत आहे हे मात्र सिध्द झाले आहे. शरद पवार भल्या भल्यांना समजले नाही या प्रश्नाचे उत्तर सहा दशकांनंतर ही मिळत नाही ते यासाठीच.सध्या गुड बुक्स मध्ये अनिल कदम यांनी बाजी मारली असताना रोजच्या बदलत्या राजकारणात कोण बाजीगर ठरेल हे लवकरच समजेल.त्यासाठी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत,शेतमालाला हमी भाव,ड्रायपोर्ट, तालुक्याचे रस्ते आदी मूलभूत प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्याचे आव्हान कायम आहे.