माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
सध्या किमान तापमानाचा पारा खाली घसरतोय, असे जरी ऐकू येत असले तरी किमान तापमान हे अजून डिसेंबरच्या सध्याच्या दिवसांतील सरासरीच्या पातळीत अजूनही आलेले नाही. म्हणून तर या दिवसातील अपेक्षित थंडी अजून जाणवत नाही. सध्या जाणवत असलेल्या थंडीचे किमान तापमान हे सध्याच्या अपेक्षित सरासरी किमान तापमानापेक्षा अधिकच आहे. डिसेंबर महिन्यात जाणवणारी थंडी याच पातळीत राहील किंवा फार झालं तर शेवटच्या आठवड्यात अजून काहीशी खालावेल, असे वाटते.
सध्याचे महाराष्ट्रातील तापमान भाग परत्वे हे १५ ते १७ डिग्री सें. ग्रेड च्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा २ डिग्रीने अधिकच आहे. महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सध्या २९ डिग्री सेंग्रेड दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा १ ते दिड डिग्रीने अजुनही कमीच आहे. म्हणजे सध्या जाणवत असलेला थंडावा अजुनही कायमच आहेच. सरासरी गाठण्यासाठी अजुन दिवसा अधिक ऊबदारपणा अपेक्षित आहे. म्हणून तर आर्द्रताही कमीच आहे.
उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाच्या काळ संपतच येत आहे. डिसेंबर हा महिना ह्यासाठीचा शेवटचा महिना समजावा. भारत समुद्रीय क्षेत्रात चक्रीवादळाची सध्या कोणतीही बीजरोवणी नसून उर्वरित ह्या महिन्यात महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा कोणताही प्रभाव असणार नाही, असे दिसते.
त्यामुळे डिसेंबर महिन्यात जी काही थंडी सध्या पडत आहे, आणि जी उर्वरित महिन्यात पडणारच आहे, ती हिरावण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे थंडीसाठी ही एकत्रित एक जमेची बाजूच समजावी.
आगाप पेरीची/ लागवडीची रब्बी शेतपिके व फळबागांसाठी त्यामुळे थंडीची ही स्थिती अनुकूलच असेल , असे वाटते. तीव्र एल निनोच्या शक्यतेमुळे रब्बी हंगामाच्या उत्तर्धात उष्णतेत होऊ शकणाऱ्या वाढीमुळे पुढे सरासरी अपेक्षित जोरदार थंडीबद्दल थोडी साशंकता असुन लेट पेर /लागवडी पिकांतील फळ व धान्य पोसण्यास कदाचित अडचणीही जाणवू शकतात असे वाटते.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात सध्या तरी नजिकच्या काळात पावसाची शक्यता जाणवत नाही. उत्तर भारतात किमान तापमान सध्या एकांकीपर्यंत पोहोचले आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.