नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील निघालेल्या युवा संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्यांना विधानसभवन येथे जाण्यास पोलिसांनी बॅरिकेट टाकून अडवले. त्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यानंतर आमदार रोहित पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे नागपुरचे हिवाळी अधिवेशनातील वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यभरात ८०० किमीचा प्रवास करुन ही यात्रा आज नागपूरमध्ये धडकली. या यात्रेचा नागपुरात मोठा समारोपाचा कार्यक्रमही झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा.संजय राऊत यांच्यासह मोठे नेते उपस्थितीत होते. त्यानंतर रोहित पवार यांची ही युवा संघर्ष यात्रा थेट विधान भवनाच्या दिशेला निघाली.
यात्रा विधान भवनकडे येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बॅरिकेट्स लावत कार्यकर्त्यांना अडवले. पण, कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटीलही सहभागी झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना रोखले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले अरे हे सामान्य लोकांना सोडच नाहीत. लाठीचार्ज करतात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. अरे शेतकऱ्यांची मुलं आहेत. गरिबाची मुलं आहेत. त्यांना तुम्ही लाठीचार्ज करत आहात. आम्ही काय म्हणतोय, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, युवकांचे, स्पर्धा परीक्षांचे, बेरोजगारीचे, महिला सुरक्षेचे, आरोग्याचे प्रश्न सोडवा. याबद्दल चर्चा करु. बोलुया. पण त्यांना अहंकार आहे. तहसीलदारला पाठवतात, या शहराच्या भाजप अध्यक्षाला पाठवतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद नाही? असा प्रश्नही त्यांनी केला.