नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खो-खो फेडरेशन च्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
या स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास आयुक्त संदीप गोलाईत, नाशिक जिल्हा खो – खो असो.चे अध्यक्ष विश्वास ठाकूर, छत्रपती पुरस्कार प्राप्त सतीश धोंडगे,नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या हस्ते पार पडले.
या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांचे २८ मुलींचे आणि २८ मुलांचे असे एकूण ५६ संघ सहभागी झाले आहेत. या २८ मुलांच्या आणि २८ मुलींच्या संघाची आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. या आठ गटामध्ये आज आणि उद्या दोन दिवस गटवर साखळी सामने पार पडणार आहेत. या गटवार साखळी सामन्यातील निकालानंतर प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या पात्र ठरलेल्या १६ मुलांच्या आणि १६ मुलींच्या संघामध्ये बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.
आज पहिल्या दिवशी पार पडलेल्या साखळी सामन्यात मुलांमध्ये जम्मू – काश्मीर संघाने दादरा आणि नगर हवेली संघावर एक डाव आणि एक गुणाने पराभव केला. तर तमिळनाडू संघाने पॉडेचरी संघाला एक डाव आणि चार गुणानी पराभूत केले. तर उत्तरखंडने राजस्थानला तर पंजाबने सी.बी.एस.सी. संघाला पराभूत केले. केरळ संघाने उत्तर प्रदेश संघाचा पाच गुणानी पराभव केला. तर तेलंगणा संघाने एन, व्ही. एस. संघावर दोन गुण आणि २.२०मिनिटे राखून विजय मिळविला. तर कर्नाटक संघाने सी.आय.एस.सी.ए. या संघावर एक डाव आणि आठ गुणानी विजय मिळविला.
मुलींच्या गटात दिल्ली विरुद्ध पॉडेचरी यांच्यातील सामन्यात देल्ली संघाने विजय मिळविला ,तर उत्तराखंडने दादरा -नगर हवेलीचा पराभव केला. पंजाब संघाने सी.बी.एस.सी. संघाला पराभूत केले.तर पश्चिम बंगाल संघाने हिमाचल प्रदेशवर विजय मिळविला.
या स्पर्धा खो-खो साठी असलेल्या अधितकृ मॅट च्या मैदानावर खेळविल्या जात असून स्पर्धेसाठी चार मैदाने तयार करण्यात आली आहेत. मैदान व्यवस्था खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गर्दर्शनाखाली सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.
या स्पर्धेसाठी मॅटचे क्रीडांगणावरील व्यवस्था खो-खो चे क्रीडा संघटक मंदार देशमुख आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.