इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अचानक दिल्लीला गेल्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. अचानक जाण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे कारण बोलले जात आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. त्यामुळे अगोदर राजकीय चर्चा सुरु होती. त्यात शिंदे व फडणवीस अचानक दिल्लीला गेल्यामुळे त्यात भर पडली आहे. दिल्लीला हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे अंतर्गत धुसफुस सुरु असून त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याचे अगोदरपासून बोलले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती दर्शनाला सर्व नेते गेले. पण, अजित पवार गेले नाही. त्यावेळेस सुध्दा चर्चा रंगली. पण, त्यानंतर दोन्ही नेते ओबीसी बैठकीत एकत्र दिसले. त्यानंतर अजून एका रात्री झालेल्या बैठकीत हे नेते होते.
वरवर हे सुरु असले तरी अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा मात्र आज त्यांच्या गैरहजेरीने स्पष्ट झाली. प्रकृती अस्वस्थेमुळे ते गैरहजर असल्याचे सांगण्यात आले असले तरी ही नाराजी मोठी आहे. त्यामुळेच गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीला या दोन्ही नेत्यांना बोलावल्याचे बोलले जात आहे.