नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नंदकिशोर साखला (नाशिक) यांची भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) राष्ट्रीय अध्यक्षपदी २०२५ व २०२६ या कालावधी साठी निवड करण्यात आली. ही निवड संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी पुणे येथील राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत घोषित केली.
यावेळी वर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड – इरोड, राष्ट्रीय महासचिव राजकुमार फतावत – उदयपूर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पारख – नागपूर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील – सांगली, राष्ट्रीय सचिव पंकज चोपडा – रायपूर, राष्ट्रीय सचिव राजेश जैन – नवी दिल्ली, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शाह – सोलापूर, गौतमचंद संचेती – छ. संभाजी नगर आदि उपस्थित होते.
घोषित निवडीनुसार साखला हे २०२४ या वर्षी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून तर २०२५ – २०२६ या दोन वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
बी जे एस ही अशासकीय नोंदणीकृत संस्था असून देशभरातील हजारो समर्पित कार्यकर्त्यांसह गेल्या ३८ वर्षांपासून समाज सेवा, शैक्षणिक विकास, आप्पती व्यवस्थापन, कौटुंबिक प्रश्नांचे निवारण, जल व्यवस्थापन इत्यादी विषयांवर कार्यरत आहे.
साखला हे संस्थापक सदस्यांपैकी आहेत. तसेच सध्या ते महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कोविड काळात तसेच मिशन १०० जिल्हे जल पर्याप्त अभियानात उल्लेखनीय कार्य केले असून उत्तम संघटन कौशल्य, वाक चातुर्य व समर्पण हे सर्व हेरून व त्यांची कामगिरी पाहून एकमताने ही निवड झाली आहे. बीजेएसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रथमच नाशिक कडे आल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे