पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६० हजार केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील जलसंपदा विभागाच्या आवारात पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६० हजाराच्या रोकड लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत सुखदेव दौंड (रा.चेहडी,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दौंड सोमवारी (दि.११) जलसंपदा विभागाच्या मेरी येथील कार्यालयात गेले होते. सीडब्ल्यूएमडी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली महिंद्रा एसयुव्ही कार पार्किंग केली असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पार्क केलेल्या कारची काच फोडून १ लाख ६० हजार रूपये असलेली हॅण्ड बॅग चोरून नेली. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
कारचे सायलेन्सर चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारचे सायलेन्सर चोरट्यांनी खोलून नेल्याची घटना केरू पाटील नगर भागात घडली. या घटनेत सुमारे ५० हजार रूपये किमतीचे सायलेन्सर लांबविले असून, याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण सदाशिव खोंडे (रा.एमएसईबी सबस्टेशन समोर,केरू पाटील नगर ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खोंडे याची इको कार एमएच १५ जीआर ३८३५ गेल्या शुक्रवारी (दि.१) रात्री त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारचे सुमारे ५० हजार रूपये किमतीचे सायलेन्सर खोलून नेले. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.