इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोपातून पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना अजून एक नोटीस आली आहे. त्यात त्यांना बेगला खाली करण्यास सांगितले आहे. मोईत्रा यांना पाच दिवसांतच दुसरा धक्का बसला आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात आठ तारखेला रोख रकमेच्या आरोपांमुळे त्यांचे संसद सदस्यत्व गमावले आणि आता लोकसभेतून हकालपट्टी केल्यानंतर, संसदेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे.
मोइत्रा यांनी लोकसभेतून हकालपट्टी केल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या हकालपट्टीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीवरून संसदेच्या नीती समितीने या प्रकरणाची चौकशी केली. समितीच्या शिफारशीनुसार, मोइत्रा यांचे सदस्यत्त्व रद्द केले. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून मोईत्रा यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप दुबे यांनी केला होता.
महिला खासदाराचा छळ केल्याचा आरोप
सदस्यत्व रद्द केल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की जर या मोदी सरकारला असे वाटले असेल की माझ्यावर कारवाई करून ते अदानी प्रकरण दूर करू शकतील. तर तसे होणार नाही. आज तुम्ही अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. या प्रकरणात घाई व प्रक्रियेचा गैरवापर करण्यात आला. तुम्ही एका महिला खासदाराचा छळ केल्याचाही आरोप त्यांनी केला.
७५ लाख रुपये, भेट वस्तू
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना त्यांनी ७५ लाख रुपये दिले होते. मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील हिरानंदानी यांनीच केली होती, असे आरोप दुबे यांनी केले होते.