नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण व गाररपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई हे दोन मुख्य विषयाकडे सर्वांचे लक्ष आहे. पण, यातील एका विषयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी करणार आहेत. त्यातून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
काल काँग्रेसच्या मोर्चात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र सरकार मदत करत नाही असे सांगत हल्लाबोल केला.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटकाळात शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली. विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना मदतीबाबत काय घोषणा करतात, याकडे लक्ष लागले आहे.
आधीच दुष्काळ त्यात अवकाळीचा हल्ला यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देणार, या घोषणेचा किती शेतकऱ्यांना आणि किती फायदा होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्षेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.