योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड – येथील वडाळी रस्त्यावरील कॅनॉल जवळ निर्भवणे या शेतमजुराच्या शेळ्या मेंढ्यांच्या फार्ममध्ये मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत या हल्ल्यात तब्बल नऊ शेळ्या ठार केल्या. तब्बल एक तास थरार या वस्तीवर सुरू होता.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, कैलास मल्हारी निर्भवणे हे कसबे सुकेणेच्या निसाका कारखाना- वडाळी रस्ता पाच नंबर कॅनाल या शिवारात पोल्ट्री जवळ राहतात. त्यांच्या या पोल्ट्रीमध्ये दोन बिबट्यांनी तुटलेल्या पत्र्यामधून शिरकाव करून नऊ शेळ्याना फस्त केले. हा सर्व थरार कैलास निर्भवणे व कुटुंबियांनी डोळ्यांनी बघितला.
या घटनेमुळे कैलास निर्भवणे यांना चांगलाच धक्का बसला. ते ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. त्यांना मुलाचे व मुलीचे लग्न करायचे होते. त्यात बिबट्याने शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्या फस्त केल्या. या पाळीव प्राण्यातून त्यांना आर्थिक मदत होत होती. ते त्यांचे उदरनिर्वाचे साधन होते. पण, बिबट्याने हल्ला करुन हे सर्व फस्त केले. या घटनेमुळे सुकेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येवला विभागाचे वनक्षेत्रपाल अक्षय मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय वनपाल भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची कारवाई सुरू केली आहे. तब्बल तासभर बिबट्याचा हल्ला होण्याची ही घटना बहुदा नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलीच असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.