नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –गेल्या दहा वर्षात परदेशातून जप्त करण्यात आलेल्या पुरातन कलाकृतींपैकी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेतून जप्त करण्यात आलेल्या ३१ पुरातन कलाकृती तामिळनाडूतील आहेत. एएसआय ने १९७६ ते २०२३ या कालावधीत परदेशातील ३५७ पुरातन कलाकृती परत आणल्या आहेत, त्यापैकी २०१४ पासून ३४४ पुरातन कलाकृती परत मिळवल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक,पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.
राज्याच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या भारतीय पुरातन कलाकृती पुन्हा देशात आणल्या जात आहेत. जेव्हा एखाद्या पुरातन कलाकृतींच्या चोरीची तक्रार केली जाते, तेव्हा संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जातो आणि चोरी झालेल्या पुरातन कलाकृतींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची बेकायदेशीर निर्यात रोखण्याच्या दृष्टीने दक्ष राहण्यासाठी सीमा निर्गमन मार्गासह कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांना ‘लूक आउट नोटीस’ जारी केली जाते. पुरातन कलाकृती सापडल्यास, त्या परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय ) समन्वयाने संबंधित कायदा अंमलबजावणी आंस्थेद्वारे प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो.
भारतातून घेऊन गेलेल्या मूळ भारतीय पुरातन कलाकृती परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते.