नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भूखंडाचा व्यवहार पूर्ण न करता इसार पोटी दिलेला धनादेश वटवून घेत संशयिताने ही आर्थिक फसवणुक केली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड व्यवहारात तोतया वकिलाने एकास दोन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज कुमार आनंदराव गवई (रा.धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) व सुरेश प्रेमचंद उर्फ प्रेमचंद चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत सुमित साहेबराव फड (३५ रा.ड्रीम अभिनव,शिखरेवाडी ग्राऊंड जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या जुलै महिन्यात फड यांची भेट संशयित गवई याच्यासमवेत झाली होती. वकिल म्हणून वावरणा-या संशयिताने पाथर्डी फाटा भागात भूखंड विक्रीस असल्याचे सांगून त्याबाबत सुरेश चौधरी यांच्या नावे असलेल्या प्लॉट कागदपत्रांची दुय्यम प्रत दाखविली. त्यामुळे फड यांचा विश्वास बसला. फड यांनी प्लॉट घेण्यास होकार दिल्याने भामट्याने संशयित चौधरी यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. त्यामुळे फड यांनी हा व्यवहार केला. या व्यवहारा पोटी फड यांनी दोन लाख रूपयांचा धनादेश दिला होता.
त्याबदल्यास संशयिताने इसार पावतीही करून दिली होती. मात्र व्यवहार पूर्ण न करताच संशयिताने धनादेश वटवून घेतला. पाच महिने उलटूनही हा व्यवहार न झाल्याने फड यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फड यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.