नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक आणि नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, हिरवाडी रोड, नाशिक येथे दिनांक १२ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान १९ वर्षे मुले आणि मुली यांच्या शालेय राष्ट्रीय खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मॅटवर स्पर्धा होणार :- या स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. यासाठी मॅटचे चार क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. यावेळी नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील यांनी या स्पर्धेसंदर्भात माहिती दिली आहे. याप्रमाणे दिनांक ३ ते ७ डिसेंबर दरम्यान १७ वर्षे गटाच्या राष्ट्रीय स्पर्धाचे चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे दिनांक १२ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान १९ वर्षे मुले आणि मुली यांच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये भारताच्या विविध राज्यांच्या २८ मुलांच्या आणि २८ मुलींच्या संघानी आपला सहभाग नोंदविला आहे. याप्रमाणे या स्पर्धेसाठी ६७२ खेळाडू आणि ७७८ प्रशिक्षक, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र खो-खो असो सि एशने पदाधिकारी, पंच, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने आणि त्यांनंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
निवास आणि भोजन स्थानिक प्रवास व्यवस्था :- खेळाडूं, प्रशिक्षिक, व्यवस्थापक पदाधिकारी यांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून येणाऱ्या खेळाडूंसाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून ते निवास स्थळापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
उदघाटन :– या स्पर्धेचे उद्घाटन उद्या मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धा दिनांक १२ ते १७ डिसेंबर दरम्यान सकाळी ०८.०० ते ११. ०० आणि दुपारी ०३.३० ते रात्री ०८.०० या वेळेमध्ये खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नियुक्त केलेले अधिकृत पंच पार पडणार आहेत. स्पर्धेत लाईव गुणफलक असणार आहे. तर या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनलवर केले जाणार आहे.
या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, संदीप ढाकणे आणि इतर सहकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी मॅटचे क्रीडांगणावरील व्यवस्था खो-खो चे क्रीडा संघटक मंदार देशमुख आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तरी नाशिकच्या जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.