चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुली येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत आज आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, सिपीएम,शिवसेना यासह विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थितीत होते. हे सर्व बाजार समिती आवारातून मोर्चा काढत महामार्गावर गेले. येथे रास्ता रोको करण्यात आला.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यामुळे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतत चांदवड येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. कांद्याच्या प्रश्नावर पहिल्यांदाच शरद पवार हे रस्त्यावर उतरले असून त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
यावेळी पवार म्हणाले की, सरकारने केंद्र सरकारमध्ये जे बसले त्यांना जाण नसेल तर शेतकरी उदध्वस्त व्हायला वेळ लागणार असे सांगत त्यांनी कांदा निर्यात बंदीवर केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी शेतक-यांच्या व्यथा दिल्लीत मांडल्या जाणार असल्याचे सांगितले. आंदोलन केल्याशिवाय सरकारला जागा येत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नावर राजकारण नको असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिकच्या शेतक-यांची ताकदीचाही उल्लेख करत अगोदर झालेल्या आंदोलनाचे उदाहरण दिले.
कांदा निर्यात बंदीचा एक निर्णय़ कांदा उत्पादक शेतक-यांचा संसार उदध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे. आम्हाला रस्त्यावर बसायची हौस नाही. आम्हाला रास्तोरोको करुन लोकांना त्रास द्यायचा नाही. पण, हे केल्याशिवाय दिल्लीत कळत नाही. कांदा निर्यातबंदीनंतर इतके दिवस राज्यातील सत्ताधारी त्याबद्दल बोलत नव्हते. पण, आज चांदवडमध्ये आंदोलन होणार हे कळाल्यानंतर आज सकाळपासून सत्ताधारी नेते केंद्राशी चर्चा करणार असे बोलू लागले असे सांगत त्यांनी टीका केली.
यामुळे केली चांदवडची निवड
याअगोदही चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. पण, त्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यामुळे पवार यांनी चांदवडची निवड केली असून येथे आंदोलन केले. शुक्रवारी शेतक-यांनी जिल्हयात ठिकठिकाणी आंदोलन झाले. त्यानंतर नाशिक जिल्हा कांदा व्यापा-यांनी बेमुदत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे कांद्याचा प्रश्न आता चिघळणार असल्याचे चित्र आहे.
हे आहे कारण
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे.
असे घसरले भाव
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे शुक्रवारी सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे