इंडिया दर्पण ऑनलाईन
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात वेगवेगळ्या प्रश्नावर मोर्चे धडकत आहे. या अधिवेशनात आज कांदा निर्यात बंदीसह विविध शेतीशी संबधीत प्रश्न गाजणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून जुंपण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच सकाळी विधीमंडळाच्या पाय-यावर झालेल्या आंदोलनाने दिसून आले.
कांद्याला भाव मिळायलाच पाहिजे… कांद्यावरील निर्यात बंदी हटवली पाहिजे…कांदा उत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणणा-या सरकारचा निषेध असो..अशा घोषणा देत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पाय-यावर आज विरोधकांनी आंदोलन करुन कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. गळ्यात कांद्याच्या माळा घालत हे आंदोलन करण्यात आले. तर काही सदस्यांनी कांद्याची टोपली या आंदोलनात नेली होती. त्यानंतर सभागृहात सुध्दा या प्रश्नावर चर्चा सुरु आहे.
मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळे आदी विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करत आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करते का आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय निर्णय घेते? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.