नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला भाव मिळायलाच पाहिजे… कांद्यावरील निर्यात बंदी हटवली पाहिजे…कांदा उत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणणा-या सरकारचा निषेध असो..अशा घोषणा देत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पाय-यावर आज विरोधकांनी आंदोलन करुन कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. गळ्यात कांद्याच्या माळा घालत हे आंदोलन करण्यात आले. तर काही सदस्यांनी कांद्याची टोपली या आंदोलनात नेली होती.
यावेळी महाविकास आघाडीती घटक पक्षाचे आमदार उपस्थितीत होते. राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असल्याचे सांगत त्यांनी कांदा प्रश्नावर भाष्य केले.
राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असल्याचेही यावेळी विरोधकांनी स्पष्ट केल्या. त्याचबरोबर कांदा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.