इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः विरोधी पक्ष ’इंडिया’ आघाडीची बैठक येत्या ७ ते ८ दिवसांत होणार आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या बैठकीत सामायिक कार्यक्रम आणि जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत विरोधी पक्ष निवडणुकीचा सामायिक अजेंडा काय असेल हे ठरवणार आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आघाडीचा पराभव करणे हे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडे जास्त वेळ शिल्लक नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. ‘इंडिया’ आघाडीकडे केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले, की लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर २०१९ च्या तुलनेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये आमची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. पराभवावरून काँग्रेसमध्ये मंथन झाले. विधानसभा निवडणुकीत जे निकाल हाती आले, ते अत्यंत अनपेक्षित आहे.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पराभवाला सामोरे जावे लागेल, अशी पक्षातील कोणालाही अपेक्षा नव्हती. विधानसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात चर्चा झाली. पराभवानंतर मोकळेपणाने बोलणे गरजेचे होते. त्यामुळे अत्यंत विधायक बैठक झाली, असे पक्षाचे मत आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तळागाळात ध्रुवीकरण जाणवत होते. राजस्थानमध्ये २०१९ इतक्या जागा मिळतील, असे आम्ही गृहीत धरत होतो; मात्र छत्तीसगडचा निकाल अनपेक्षित लागला आहे. आदिवासी भागात पराभवाला सामोरे जावे लागले.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकाच राज्यात विजय मिळवता आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मिझोराममध्ये झेडपीएम विजयी झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. अशा स्थितीत निदान छत्तीसगडमध्ये तरी पक्ष आपले सरकार वाचवेल, अशी आशा होती. मध्य प्रदेशातही काँग्रेसचे पुनरागमन निश्चित मानले जात होते; मात्र निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदी भाषक राज्यांत तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार असताना काँग्रेसला जास्त जागांवर दावा करता येणार नसल्याचे सांगितले जाते.