लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी शहाणे व्हावे, अन्यथा त्यांना उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. या इशा-यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणावर बोलत राहत तर स्वागत करु, पण, फडणवीसांवर टीका केली तर गाठ मराठ्यांशी असे सांगितले.
जरांगे पाटील लातूर, धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला; मात्र त्यांनी फडणवीस आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरू कराव्यात. मराठ्यांचा शिंदे यांच्यावर विश्वास आहे. जे अधिकारी कुणबी मराठाच्या नोंदी जाणूनबुजून सापडू देत नसतील, ते कामापासून दूर होतील. कितीही ढोल वाजवत बसले, तरी आरक्षण मिळणारच. फडणवीसांनी आताच शहाणे व्हावे नाही, तर मी सगळे बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावे. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
फडणवीस यांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला लावले आहे. त्यांच्या ताटात जेवणारी माणसे बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला, तरी ओबीसी-मराठा एकत्र आहे, असा दावा त्यांनी केला. भुजबळांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, की शहाणा माणूस असता, तर उत्तर दिले असते.