इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी आज झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत त्यांचा भाचा आकाश आनंदला पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी आकाश आनंदकडे पक्षाची जबाबदारी सोपवली होती; मात्र निवडणुकीत पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
लखनऊमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आकाश आनंद यांना मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली. आकाशला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करत त्यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता संपूर्ण देशाची जबाबदारी आकाश आनंदकडे सोपवण्याची घोषणा केली. आकाश हा मायावती यांचा लहान भाऊ आनंदचा मुलगा आहे. आकाशने लंडनमधील एका मोठ्या कॉलेजमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सहा वर्षांपूर्वी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मायावतींनी सहारनपूरमधील एका सभेत आकाशला लॉन्च केले होते.
गेल्या काही वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावती दुसऱ्या पिढीला पुढे नेण्यावर भर देत असल्याचे मानले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मायावतींनी त्यांचा भाचा आकाश आनंदला राजकारणात बढती देण्यास सुरुवात केली. मायावतींनी त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदे दिली. आकाशला निवडणूक राज्यांचे प्रभारी बनवण्यात आले. आकाश यांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखे संकल्प यात्रा’ या नावाने साडेतीन हजार किलोमीटरचा यात्रा केली. या प्रवासाला ‘बहुजन अधिकार यात्रा’ असे नावही देण्यात आले. आकाश आनंद ज्या राज्यांमध्ये पक्ष कमकुवत आहे, तेथे काम करणार आहे.